कारच्या धडकेत विद्यार्थी ठार, दुसरा तरुण जखमी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : काम करून शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या एका विद्यार्थ्यांचा सुसाट कारच्या धडकेत मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात हर्सूलमधील जुना जकात नाका येथे रविवारी (दि. ८) रात्री झाला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत दिलीप निंबाळकर (२३, रा. न्यू पहाडसिंगपुरा, मुळ रा. लांडून, ता. खामगाव, जि. बुलढाणा), असे मृत विद्यार्थ्यांचे तर मनोज सदाशिव भिलन असे जखमीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली. मंगेश कोलते असे कारचालकाचे अधिक माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी अनिकेतसह मनोज सदाशिव भिलन, अविनाश नितावणे, विशाल भंडारे व इतर तरुण आईसाहेब लॉन्स येथे लग्नात केटरिंगच्या कामासाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर रात्री उशिरा वाहनाची कोणतीही सोय नसल्याने सर्वजण पायी पहाडसिंगपुराकडे निघाले. हर्सूल जुना जकात नाक्याजवळ मागून येणार्‍या सुसाट कारच्या (एमएच २०, एफयू ७५७५) चालकाने अनिकेत निंबाळकर व मनोज भिलन यांना जोराची धडक दिली. धडकेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे पावणेचारच्या सुमारास अनिकेतचा मृत्यू झाला.
आर्थिक स्थिती नाजूक
बुलढाणा जिल्ह्यातील अनिकेत निंबाळकर याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तो अभ्यासात हुशार असल्याने कुटुंबीयांनी त्याला शिक्षणासाठी संभाजीनगरात पाठविले होते. तो एमएसडब्ल्यू विषयात पी.एचडी.चे शिक्षण घेत होता. तसेच स्पर्धा परीक्षेचीही तयारी करत होता. आई आणि भाऊ कंपनीत तर वडील शेती करून त्याला शिक्षणासाठी मदत करीत होते. तसेच अनिकेतही मिळेल ते काम करून खर्चाला हातभार लावत असे.